प्रवास आपल्या
जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. आपला जन्म हाच एका प्रवासाची सुरवात आहे. ज्याची सुरवात
तर आपणाला माहीत आहे पण त्याचा शेवट नाही कारण यामध्ये असलेली अनिश्चितता. त्याचे
प्रत्येक स्टेशन आपण तयार करत असतो. पण सहप्रवासी मात्र बदलत असतात. कधी आपली जागा
बदलत असते. कधी आपण बदलतो. काही सहप्रवासी हवेहवेसे वाटतात तर काही जण शेवटच्या
टप्प्यापर्यंत कळतच नाहीत. गूढ, शांत, स्वतःत रमलेले. असाच हा एक प्रवास.
प्रवास सुरु झाला. कारण झाड मागे जाऊ
लागली होती. सकाळची वेळ. सकाळच असावी.........कदाचित. का कुणास ठाऊक.....अजूनही
खात्री होत नव्हती. पण अचानक पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येऊ लागला होता. पक्ष्यांचे
थवे आकाशात दिसू लागले होते. मग लक्षात आले की खरोखरच सकाळ झाली होती. कारण
डोंगरामागून सूर्य हळूहळू डोकावताना दिसत होता. खूप दिवसांनी उगवणारा सूर्य पाहत
होतो. म्हणजे.....? सगळी नजर सूर्याकडे खिळली होती आज पूर्ण सूर्योदय पाहणारच असाच
काही निश्चय केला होता पण वळणे घेणारी गाडी, कधी कुठल्या झाडांमागून इतका वेळ गेली
की सूर्य दिसला पण सूर्योदय नाही. काळोखात आकुंचलेल्या डोळ्याच्या बाहुलीत प्रकाश
जाताच डोळे मिचकावत, कपाळाला आठ्या पाडत सूर्य डोळे भरून पाहिला.... का याच उत्तर
अजूनही सापडत नाहीय.
खिडकीजवळची जागा मिळाली होती. किती
आनंदाचा क्षण. कारण खिडकीतून येणारा थंड वारा. आणि मस्त डुलकी. डुलकी अशी की डोक
खिडकीवर आपटून आपटून टेंगुळ यायलाच हवं. हवहवस......का याच उत्तर अजूनही सापडत
नाही. हनुवटीवर ओघळणारी लाळ पुसत आणि सोबती काय म्हणतील याचा विचार करत....पुन्हा
एक डुलकी. डुलकी मोडणारे ....... झोप मोडते पण डुलकीसाठी काय म्हणतात याचा विचार
करायला हवा होता. खड्डे, गतिरोधक आणि अचानक वळणावर येणाऱ्या लहान गाड्या..... त्यातील
डुलक्या घेणारे ड्रायवर. पण हळूच नजर त्या गाड्यांकडे जायची आणि आणि माझी डुलकी
पुन्हा मोडायची.
शेजारी बसलेले महाशय जरा गमतीशीरच
म्हणायला हवे. कदाचित मला आलेल्या डुलकीतल्या स्वप्नातच ते मला जास्त कळाले अस
म्हणायला हवं. कारण ते तर माझ्यापेक्षा डुलकीबहाद्दर. सीटवर बसल्यापासून कधी जागे होते
हे जवळजवळ बसमधल्या सर्व प्रवाशांना माहीत कारण त्यांचा मधुर कर्कश घोरण्याचा
आवाज. घोरण्याचा आवाज थांबला म्हणजे महाशय जागे झाले याचेच प्रतीक. त्याचं डोक
स्वतःच्या धडापेक्षा माझ्या खांद्यावर होते. कानात खाज आली की तर ते कहरच करायचे.
एक विचित्र आवाज. खरखरीतच. तुम्हीच कल्पना करा. राग येऊनसुध्दा काहीही बोललो
नाही....... का याच उत्तर अजूनही सापडत नाही.
चहा हे निम्मित ठरले गाडी थांबण्याचे.
पण आमचे शेजारी मधुर कर्कश वादन करतच होते. शेवटी थोडा धीर करून.... जरा मोठ्या
आवाजात .....ओ उठा..... तर त्याचं काय दुसरच चालू........ म्हणतात... मीच का ? तू
उठ.... काहीही न बोलता सीटसमोरच्या अरुंद जागेतून जायचा प्रयत्न केला पण महाशयांचा
झोपेचा हॅंगओवर
जायचं नावच घेत नव्हता. शेवटी समोरच्या सीटवरून उडी मारून गाडीबाहेर गेलो. कदाचित
एक दोन शिव्या घालतच. गाडीच्या इंजिनकडे उभं राहण्याचा केविलवाणा प्रयत्न केला पण
काही थंडी कमी झाली नाही. उगाचच काही जण आता पहिल्यासारखी थंडीच पडत नाही असे दावे
करत होते. काहीजण नेहमीप्रमाणे झुरकेबहाद्दूर. धुराच्या रेषा, वर्तुळे काढत पायाने
वेगवेगळे आकार काढण्याचा प्रयत्न करत होते. आणि मी उगाचच... इकडेतिकडे फेरफटका
मारत. हाताची घट्ट घडी घालून, हातावर हात चोळत....... गाडी सुटायची वाट बघत......
का याच उत्तर अजुंही सापडत नाही.
काहीजणी मेकअप कीट घेऊन बसल्या होत्या.
तर काहीजण गाडीतच बसून खात बसले होते. मी काही गाडीत नव्हतो पण गाडीबाहेर कचरा
फेकायला येणारे हात तेच सुचवत होते. काहीजण ताजेतवाने होत होते. ड्रायवर आणि कंडक्टर
आपल्या नेहमीच्या दिनक्रमाशी एकनिष्ठ राहून आपली कामे पटापट करत होते. आणि एका
क्षणी त्यांची पाऊले गाडीकडे वळली. आणि त्याच क्षणी माझ्या शेजारी बसलेले महाशय
गाडीतून उतरण्याचा तयारीत असतानाच ........ एक आवाज ऐकू आला. चला....... चला.......
खूप वेळ झाला गाडीत बसा... साडेदहा वाजेपर्यंत डेपोत पोचायचे आहे. नंतर आम्हाला पण
आमची काम आहेत. तेव्हा दोन गोष्टी लक्षात आल्या. पहिली म्हणजे हातात घड्याळ बांधलेले
आहे. आणि त्यात पाऊणे आठ वाजले आहेत. आणि दुसरी म्हणजे ड्रायवर आणि कंडक्टर आपल्या
सारखेच माणूस आहेत. विचारांचा गुंता उगाचच. शेजारचे महाशय मला का उठवलं नाही असे
काही प्रश्न विचारात होते पण माझ लक्ष दुसरीकडेच. ....... का याच उत्तर अजूनही सापडत नाही. कदाचित तो विचाराचा गुंता.
आता गाडी मुक्कामाकडे जात होती. एक एक
प्रवासी आपल्या थांब्यावर उतरत होते. आणि अशाच एका थांब्यावर माझ्या शेजारी
थांबलेले महाशय गाडीतून उतरायची तयारी करू लागले. काहीतरी शोधात होते. ते सापडले
म्हणून आनंदी होऊन स्वतःशीच हसत....पुन्हा काहीतरी शोधत ..... मनात उगाचच प्रश्न
काय बर एवढ शोधत असतील.......चावी, मोबाईल आणि मध्येच गमतीने पासपोर्ट तर नाही ना असे
कल्पनाविलास करत बसलो होतो. काही वेळाने महाशय
स्वतःहूनच सांगतात की सुट्टे पैसे शोधत होतो. त्यांनी जाहीर केल म्हणजे त्यांना अपेक्षित
सुट्टे मिळाले असतीलच. असो. महाशय अशाच एका थांब्यावर उतरल्यावर मला .......
लांबूनच हात दाखवून चला येतो म्हणून मार्गस्थ झाले.
आणि मी मात्र ....... का या प्रश्नाचं उत्तर शोधत पुढच्या थांब्यावर गाडीतून केव्हा
उतरलो याच भानच राहील नाही. आणि गंमत बघा ...... गाडी निघून गेल्यावर बरोबर ठिकाणी
उतरलो का? यांची खात्री करत होतो. ....... का याच उत्तर अजूनही सापडत नाही.
काका सोनार गणेश चित्र शाळा
जनहास्यार्थ प्रकाशित.
© All Rights Reserved.
Comments
Post a Comment