दिवाळीची सुट्टी असल्याने
अनेक कुटुंबे शहरातून गावाकडे आली असतील. पण कोकणातील चाकरमानी दिवाळीत मुंबईतच थांबण
पसंत करतात. कारण मे महिन्याची सुट्टी आणि गणेश चतुर्थीला त्यातले बहुतेक जण गावी
येऊन गेलेले असतात. पण तुलसी विवाह (बारस) आणि देव दिवाळी निमित्त काहीजण गावी येतात.
त्या पैकी एका कुटुंबाची ही गोष्ट.
गेल्या रविवारचा दिवस. दुपारचे
तीन वाजले असतील. पलीकडच्या परसातून लहान मुलांचा ओरडण्याचा, खेळण्याचा आवाज येत
होता. आवाजावरून अस वाटत होत की ती मुल प्लास्टिकच्या बॉलने खेळत होती. हसणारी, बागडणारी
मुल ही भूतकाळाची आठवण करून देत होती. प्लास्टिक बॉलला आम्ही कवटी बॉल म्हणायचो. आम्हाला
कडक कवटी बॉल आवडायचा. आणि जर तो पायाच्या हाडावर बसला तर होणारी वेदना म्हणजे अगदी
डोक्यात जायची. आम्हाला त्या बॉलच्या आवाजाची गंमत वाटायची कारण तो आवाज बहुतेक कोणाला
आवडायचा नाही. असाच काही त्या मुलाचं चालू होत. आवाजावरून ती दोन तीन मुल असावीत.
पण तेवढ्यात एक कर्कश
आवाजाने लक्ष वेधून घेतला. घाबरू नका. तो काही कोणा चेटकिणीचा नव्हता. कदाचित तो
त्यांच्या आईचा होता. पण त्या आवाजाने त्या खेळणाऱ्या मुलांचा आवाज अचानक बंद
झाला.
घरातून आवाज आला की,
“जर पुन्हा खिदळलात तर मार बसेल.”
“चला घरात.”
मुलांच ठरलेलं उत्तर,
“थांब जरा आलो.”
नंतर थोडा वेळ खेळल्याचा आवाज आला पण नंतर शांतता.
ती शांतता काही सुचवत
होती. पण मी काही लक्ष दिला नाही. आणि माझ्या कामात पुन्हा गुंतून गेलो. दोन
दिवसांनतर त्यापैकी एका मुलाचा रडण्याचा आवाज येत होता. आणि तो कर्कश आवाज पुन्हा
ऐकू आला. आवाज असं सुचवत होता की, ती मुल खेळत असताना त्यांच्या अंगाला चिखल लागला
होता. आणि कदाचित त्यांची आई त्यांना मारत
होती. चिखल लागण्याच कारण की दिवाळी झाली तरीही शेतीची काम संपली नव्हती. शेतात अजूनही
काही प्रमाणात चिखल होता.
शहरातील त्या कुटुंबाचा त्रागा
आपणास समजून घेतला पाहिजे. गावातील भौतिक सुविधा, दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी,
चांगल्या डॉक्टरचा अभाव अशा अनेक चिंता या शहरातील पालकांना भेडसावत असतील. आपल्या
मुलाला खेळताना काही लागल तर, तो पडला तर काय ?, खरुज झाली तर अशा अनेक प्रश्नांनी
ते ग्रासलेले दिसत होते. दिवसभर शहरात दगदग करून काही वेळ दुपारची विश्रांती त्यांना
अधिक मौल्यवान वाटत होती.
पण लहानपण पाळणाघरात गेलेली,
इमारतीच्या गॅलरीतून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पाहणारी, शाळेत
येता जाता ट्रफिकची चुकवाचुकाव करता नाकी नऊ आलेली, इमारतीच्या पार्किंगमध्ये,
टेरेसवर क्रिकेट खेळणारी, बंद घरात कंप्युटरवर गेम खेळणारी मुल जेव्हा गावाकडच्या खुल्या
वातावरणात अधिक मोकळेपणाने वागतात तेव्हा पालकांना आनंद झाला पाहिजे. पण आनंदाची
व्याख्या जणू बदलली आहे अशी माणस वागू लागली आहेत. कारण नेहमीच्या लहान आणि छोट्या
प्रसंगात आनंद शोधणे आपण विसरूनच गेलो आहोत.
मुलांना उगाचच........... तुम्ही आता मोठे झाला आहात अस सांगून त्यांच्या
सहज प्रवृत्तीला मारून टाकणारे पालक आता गल्लोगल्ली दिसतीलच. सुट्टीतील गमतीजमती ह्या
आयुष्यभर आपल्याला साठवून ठेवता येतात. आपण कितीही निराश झालो तरीही बालपणीच्या
आठवणी आपसूकच आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात. मावस भाऊ-बहिण, चुलत भाऊ-बहिणी, मामे भाऊ-बहिणींसोबत
केलेल्या गमतीजमती ह्या माळ्यावरील गाठोड्यासारख्या असतात. आठवण झाली की उलगडून
पाहता येतात. आणि या गमतींमध्ये एक समान दुवा आहे तो म्हणजे आपण आपल्या घरातील
मोठ्या माणसांना फसवून केलेल्या खोड्या.
कारण हे करू नको, ते करू नको, अरे हळू, हाताला लागेल, हात भाजेल, अरे आवाज
नको काका झोपलाय, मामा झोपलाय. रात्री अंथरूणात पडून मारलेल्या गप्पा आणि आता झोपा
असा दिलेला सल्ला. अस बरच काही तुमच्या लहानपणी घडल असेल. आज्जीने केलेले लाडू
दुपारी सगळे झोपल्यावर खाण्यातील मजा, दुपारी कैऱ्या तोडून वर्गात खाल्लेले करमट की
तो बात ही मत करना.......लाजवाब. भुताच्या गोष्टी, काळोखाची भीती, ठकठक, चंपक आणि
चांदोबा तर आमची जान होती. चंपकची गोष्ट वाचली का? असे प्रश्न, विक्रम वेताळ, सिंहासन
बत्तीशी अश्या अनेक गोष्टी अजूनही आपल्या मनात घर करून आहेत.
पण
आजच्या एक्स बॉक्सच्या, प्लेस्टेशनच्या जमान्यात मुलांच्या आनंदाच्या व्याख्या
बदलल्या आहेत. यामध्ये लहानग्यांचा काही दोष आहे का ? तर उत्तर नाही असे आहे. तर
मग दोष कुणाचा....... दोष आपला आहे. कारण लहान मुल मोठ्यांच अनुकरण करतात. आपल्या
आनंदाच्या व्याख्या बदलल्या तर आपल्या मुलांच्या त्या नक्की बदलणार हे पालकांनी
लक्षात घ्यायला हवं. कारण आई वडिलांना आपल्या मुलांची काळजी असण हा निसर्गाचा
अलिखित नियम आहे. पण या काळजीपोटी मुलांच्या भावविश्वाचा बळी घेण हा मोठा गुन्हा
आहे. कुतूहल आणि जिज्ञासा या लहान मुलांना मिळालेल्या देणग्या आहेत. आणि निरनिराळे
अनुभव घेतल्याशिवाय या देणग्यांना काहीही अर्थ नाही. सतत नाविन्याचा शोध घेणाऱ्या मुलांना
बंधनांचा डोस देण आता आपण बंद केल पाहिजे.
कारण फुलपाखरू बघून थांबणारे मुल, त्याला पकडणारे मुल आणि अरे लागेल असं
काळजीने ओरडणारे पालक जेव्हा मुलासोबत स्वतः त्या फुलपाखराकडे धावत जातील तेव्हा
खऱ्या अर्थाने बालदिन साजरा केला जाईल. कारण Happy Children Day टाईप करताना धक्का लागला म्हणून मुलांना ओरडणारे,
चोप देणारे काळजीवाहू पालक हजारो लाईक मिळवतील आणि हॅपीनेस किती लाईक मिळाले यात
शोधतील. बाकी चॉकलेटच आमिष दाखवून मामला थंडा करण्यात आपण पटाईत आहोतच.
काका सोनार गणेश
चित्र शाळा
© All Rights Reserved.
Comments
Post a Comment