सत्याहून वेगळी....... एका वेगळ्या जगात
नेणारी....... धक्का देणारी.........मानवाला मेंदू आहे यांची जाणीव करून देणारी..........
न उलगडलेली कोडी उलगडणारी. पण स्वप्न सत्यात उतरवताना किंवा स्वप्न जगताना
येणाऱ्या अडचणी या अपेक्षाभंग करणाऱ्या असतात. आपल्या अस्तित्वाची जाणीव करून
देणारी. आपल्या भोवतालच्या जगाची जाणीव करून देणारी. अशी ही स्वप्न.
स्वप्न हा वैयक्तिक अनुभव असतो.
दुसऱ्याच्या दृष्टीने त्याला काडीचीही किंमत नसते. कारण ते आपण स्वतः जगत असतो.
इतरांसाठी त्याचे अस्तित्व नगण्य असते. कदाचित इतरांसाठी ती चेष्टेचा विषय असतील. सतत
स्वतःशी संघर्ष करायला शिकवणारे, सतत स्वतःला जाग ठेवणार, कल्पना आणि वास्तव
यामध्ये अंतर दाखवणार, सतत नाविन्याचा शोध घ्यायला प्रवृत्त करणार............असच
एक सुंदर स्वप्न....
एका तळ्याकाठी बसावं. एक सुंदर कविता
सुचावी आणि ती लगेचच कागदावर उतरावी. पुन्हा ती कागदावर अशी उतरावी की त्याचीही
एखादी कविता व्हावी. कारण एक तळ. समोर एक टेकडी. तळ्यासभोवताली झाडी झुडुपे. भोवताली
थोडेसे गवत. त्या झुडपांवर बसलेले बगळे. पाण्यात मध्येच सूर मारणारे, चोचीत मासा
पकडून मेजवानी करणारे खंड्या पक्षी. गवतावर तोल सावरणारे कीटक. पाण्यातून
डोकावणाऱ्या झाडाच्या फांदीवर बसलेले पाणकावळे. पाण्यात पांढऱ्या ठीपाक्यांसारखी
दिसणारी कमळ. पाण्यात येणाऱ्या लहानश्या लाटा. त्यावर स्वार झालेली बदकाची पिल्ले.
हेलकावे घेणारी. आपल्या आईचा पाठलाग करणारी. तळ्यातील एका दगडावर ऊन शेकत बसलेलं
एक कासव. तळ्यात पडलेल्या पानांवर चढण्याचा प्रयत्न करणारी बेडकाची पिल्ले. मधेच
तळ्यात उडी मारणारी माकडाची पिल्ले. आणि इतराची होणारी धावपळ.
पाणी कवेत घेणारे धुके. आणि त्यामधून
येणारे प्रकाशाचे झरोखे. शेकोटीतून येणाऱ्या धुराची धावपळ. शेकोटी विझल्यावर
त्याचा राखेत बसणारे कुत्रे, मांजरी. नुकत्याच तयार होणाऱ्या पायवाटा. तळव्याला
लागणारे दवबिंदू आणि माती. अनवाणी चलावस वाटत. गवतावरील मोत्यासारखे दवबिंदू.
त्यावरून हात फिरवणे. एक सुखद अनुभव. संथ पाण्यात पोहणारे मासे. त्यांची कसरत. कोळ्याची
धडपड. जाळ तयार करण्याची. जाळ्यात काहीतरी पकडण्याची. सार काही स्तब्ध. सार काही
स्थिर. सगळीकडे जिवंतपणा असूनही. माझे अस्तित्व नसूनही असल्याची जाणीव होत होती.
समोर खूप काही असून ते नसल्याचा भास होत होता. त्याचा एक भाग होऊन जाव अस वाटत
होत. त्याला न दुखावता. एकरूप व्हावं अस वाटत होत.
सूर्य डोक्यावर यायच्या मार्गावर. हळूहळू
टोचणारा. नकळत हातावरून हात फिरू लागतो. थोडासा आळस. डोळे........सूर्य प्रखर
असल्याची जाणीव करून देणारे. अंग झटकून टेकडीवर जाण्याचा निर्धार. टेकडीच टोक जवळ
असूनही दूर वाटणारं. असे अनेक निर्धार केले आजपर्यंत. पायवाटा अजूनही मळलेल्या
नव्हत्या. नवीन पायवाटा करण्याची ती वेळ. मध्येच डोकावणारे खडक. थोड थांब अस काही
सांगणारे. थोडासा विसावा. पण शेवट नाही, पुन्हा नव्याने सुरवात. वाऱ्याच्या तालावर
नाचणारे पण पुन्हा आपले अस्तित्व टिकवून असलेले टेकडीवरचे गवत. एखाद्या झुडपातून
हळूच बाहेर येऊन वेगात पळणारे ससे. थोडे दचकवणारे पण पुन्हा दिसावेत असे वाटणारे.
जवळ वाटणारे ते टोक आता बरेच जवळ आले होते.
तरीही वेळेच भान आही. बराच वेळ निघून गेला होता. दोन्ही हात ढोपरावर घ्यावेसे वाटत
होते. मस्त डुलकी घ्यावी, थोडा वेळ लोळत पडाव अस वाटत होत. फक्त काही पावलांचा
प्रश्न होता. वाऱ्याची झुळूक आता झोत झाली होती. आता वारा थंडीने टोचू लागला होता.
सूर्य उतरंडीला लागला होता. पायात होणाऱ्या वेदना आता बधीर व्हाव्यात अस वाटत होत
कारण टोक जवळ होत. शेवटची चढ आता आली होती. शरीरात त्राण नव्हता. पण ?
शेवटी रांगत, धडपडत, ठेचाळत .............टेकडीवर
पोहचलो. आणि समोर एक सुंदर दृश्य. ज्याचा मी एक भाग होतो. भाग असूनही नसल्याची जाणीव
टेकडीच्या टोकावरून होत होती. अस्तित्व असून नसल्याची जाणीव ही काय असते ते आज
समजले होते. अचानक झोताची झुळूक वाटू लागली, टोचणारा वारा गुदगुल्या करु लागला. वेदना
बधीर होऊ लागल्या. सूर्य डोळ्याच्या समांतर येऊन बोलू लागला होता. आकाशात लाल,
केशरी, किरमिजी रंगांची उधळण दिसू लागली. टेकडीची सावली त्याच्या आकाराची जाणीव
करून देत होती. टेकडीखालून उडणारे पक्ष्यांचे थवे विलक्षण, अदभूत अनुभव देत होते.
ढग टेकडीला आलिंगन देण्यासाठी जमा होऊ लागले. अलगद त्या ढगांवरून चालाव, धावाव, उड्या
माराव्यात अस वाटू लागल. काळोख अगदी समोर उभा होता पण आता कशाचीही चिंता नव्हती, काळजी
नव्हती. कारण टेकडीवरून आता अनंत अवकाशात चमचमणारे तारे खुणावू लागले होते.
नवे स्वप्न,
नवी आव्हाने,
नवे शोध,
नवे वेध,
तरीही मी,
असा........
.......कसा ?
काका सोनार गणेश चित्र शाळा
© All Rights Reserved.
Comments
Post a Comment