रांगा आपल्याला नेहमीच्याच. देवळात दर्शनाच्या रांगा,
शाळेत शिस्तीसाठी रांगा, बससाठी रांगा, मुंग्यांच्या रांगा, रेल्वे तिकीट
खिडकीवरच्या रांगा, रॉकेलसाठी रांगा, रेशनसाठी रांगा आणि बँकांमधील रांगा. पण ९
नोव्हेंबर पासून या रांगांना एक अर्थ प्राप्त झाला. रांगा या मानव हा सामाजिक
प्राणी आहे यांची प्रचीती देऊ लागल्या. कारण कधीही रांगेत न राहणारे आता ५०० आणि
१००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत दिसू लागले आहेत.
या रांगा एका
रंगमंचाप्रमाणे वाटू लागल्या आहेत. रंगमंच ? हो रंगमंच. लोकांना व्यक्त होण्यासाठी
रांगा मदत करतील याचा कोणी विचारदेखील केला नसेल. लोक रांगेमध्ये आपल्या भावना
व्यक्त करू लागले आहेत. कारण पैसा हा आपल्या जीवनात किती महत्वाची भूमिका बजावतो
याचा अनुभव अनेकांना गेल्या आठवडाभरात आला असेलच. कारण खिशात पैसा असूनही कोणी
विचारात नाही, ही भावनाच किती विचित्र आहे. कारण “पैसा बोलता है|” , पैसा फेंक
तमाशा देख | किंवा दाम करी काम. असे डायलॉग आपण ऐकले असतीलच.
लोकांना देवदर्शनाच्या
रांगेत तासनतास उभ राहायची सवय आहेच पण बँकांमध्ये पैश्यासाठी दोन दोन दिवस
प्रतीक्षा यादीत नाव लावून पैसे काढण्याची, भरण्याची आणि नोटा बदलण्याची वेळ
लोकांवर आली आहे. आपला पैसा आपल्यालाच मिळत नाही अशी काहीशी भावना सर्वसामान्य
जनतेत निर्माण झाली आहे. पुन्हा निवडणुकीवेळी पानपान भर जाहिराती देणारे पक्ष नोटाबंदीच्या
काळात एक जनहितार्थ सुचना देणारी जाहिरात देत नाहीत हा विरोधाभास आहे. कारण यासाठी
निवडणूक चिन्हांचा किंवा राष्ट्रीय नेत्यांच्या छायाचित्रांचा वापर या
जाहिरातींमध्ये करता येणार नाही.
बँकांच्या
कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीला आपण समजून घेतलं पाहिजे. कारण या निर्णयासाठी ते
मानसिकदृष्ट्या तयार नव्हते. अचानक आलेल्या या निर्णयाने ते भांबावून गेले. पुन्हा
अपुरा कर्मचारी वर्ग ही तर बँकांची बोंब आहेच. आणि आलेल्या नोटांचं योग्य नियोजन ?
कारण बँकासमोरील रांगा बघून ह्या पैश्याचं वितरण कस करायचं असा प्रश्न
कर्मचाऱ्यांना पडत असेल. अशावेळी माणस अतिशय मोकळ्या मनाने भावना व्यक्त करतात.
त्याचे प्रॉब्लेम अगदी सहजच त्यांच्या तोंडावर येतात. कारण प्रश्न पैश्याचा आहे.
पैसा हा आपल्या दैनदिन जीवनात माणसाच्या भावभावनांपेक्षा मोठा झाला आहे,
सर्वसामान्य माणसाच्या
समस्या या फार वेगळ्या असतात. औषधासाठी पैसे, किराण्यासाठी पैसे, भाजीपाला विकत
घेण्यासाठी पैसे, प्रवासासाठी पैसे या सर्वांसाठी सर्वसामान्य रोखीनेच व्यवहार
करतात. विचार करा...... जर एखाद्याच लग्न, ऑपरेशन जर पुढच्या आठवड्यात असेल तर काय
होईल. तर फक्त कल्पनाच केलेली बरी त्याला आठवड्याला फक्त २४००० हजार रुपये काढता
येईल. नशीब सरकारने मर्यादेत वाढ केली. हो. जर आपल्या घरी लग्नकार्य असेल तर
२५०००० रुपये काढता येतील. (लग्न पत्रिका घेऊन जा रे.) कारण चेकचा वापर, डेबिट कार्ड,
क्रेडीट कार्ड अशा गोष्टी त्यांना वापरण्याचा आत्मविश्वास नाही. आणि भारतातील
अर्थसाक्षरता म्हणजे............... जाऊ दे. आणि डेबिट कार्ड असल तरी ५० टक्क्याहून
अधिक एटीएम बंद. आणि चालू असली तर पुन्हा रांगाच आणि तुमचा नंबर आला आणि मशीनमधले
पैसेच संपले तर लागली वाट. आणि समजा घरात जरी २ लाख रुपये असतील तर ते नक्कीच ५००
आणि १००० च्या नोटात असतील. म्हणजे असूनही काही किंमत नाही फक्त कागदाचे कपटे.
हातावर पोट असणाऱ्या माणसाचं काय. इकडे आड तिकडे
विहीर. कारण साठवून ठेवलेली पुंजी आता कचरा ठरेल या भीतीने तो कामावर जाण्यापेक्षा
बँकांच्या रांगामध्ये जाण पसंत करतो. कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवायची वेळ
आली आहे. कारण पैसा आहे पण तो घ्यायला शेतकरी तयार नाही कारण १००० आणि ५०० च्या नोटा.
आता माल पडून राहण्यापेक्षा कमी दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. स्त्रियांचे
होणारे हाल तर घर घर की कहाणी आहे. बँकेमध्ये गेली तर जेवण कोण करणार ?, लहान
मुलांना कोण सांभाळणार ? पुन्हा अशिक्षित असेल तर परिस्थिती अगदीच बिकट.
पाचशे आणि हजारच्या नोटा कुठे स्वीकारल्या
जातील, किती तारखेपर्यंत स्वीकारल्या जातील या बद्दलच्या सुचना वारंवार दिल्या जात
आहेत. पण या सुचना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत नाही. कारण तो तर रांगेतच. आता
बँक कर्मचारी देतील त्या सूचनांच पालन करण्याशिवाय कोणताही पर्याय आपल्याकडे उरत
नाही. आणि तेच योग्य. कारण अर्धवट माहिती असण्यापेक्षा ती नसलेली बरी. नाहीतर उगाच
वाद-विवाद. एरव्ही गल्लीतील लिंबू-टिंबू राजकारणी भाई, दादा, काका यांच्या
वाढदिवसासाठी वाढदिवसाचे बॅनर लावणारे राजकीय पक्ष आता थंड
आहेत. कारण माहितीपर बॅनरसाठी पैसे आहेत पण १००० आणि ५०० मध्ये. आणि असले
तरी ते आपल्या चेल्यांना द्यायचा धोका ते पत्करणार नाहीत. कारण पुन्हा आरोप ह्या बॅनरसाठीचा
पैसा काळा तर नाही ना. मतपेटीवर परिणाम.
पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद केल्याचा फटका
बसलेले.... चिडणे स्वाभाविक आहे. कारण खिश्यात पैसे असून डॉक्टरकडे उपचार होत
नाही. मेडिकलमध्ये औषध मिळत नाहीत.( पण अपवादात्मक.) गंमत तर पुढे आहे....... कारण
बँकांमध्ये नोटा बदलून येणाऱ्या ग्राहकांना २०००च्या नोटा मिळाल्या आहेत. आणि
बाजारात गेल्यास दुकानदाराकडे दोन हजारची नोट आणि गिऱ्हायकाकडे २००० ची नोट.........
आता सांगा सुट्टे कोण देणार. आणि आता तर सुट्ट्याची व्याख्या बदलली आहे आता
त्यामध्ये १०० ची नोट सुध्दा आली आहे.
आता आपल्या सहनशक्तीची खरी परीक्षा आहे पण याचा
उगाचच देशभक्तीशी संबंध जोडू नका. नोटाबंदी आणि देशभक्ती या वेगवेगळ्या गोष्टी
आहेत. कारण नोटा बंदीवर टीका करणारा आता काळ्या पैश्यावाला किंवा देशविरोधी ठरत
आहे. पण जर आपल्या देशाचा स्पिरीट पाहायचा असेल तर जरूर या रांगा पहा. कारण एवढा
त्रास होऊनही अजून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार बँक परिसरात घडला नाही (१८
नोव्हेंबर २०१६, दुपारी एक वाजून चार मिनिटांपर्यंत). लोकांच्या समस्या या सरकारने
समजून घेतल्या पाहिजेत. कारण बँकांबाहेर येणाऱ्या गर्दीमध्ये उच्च मध्यमवर्गाची
गैरहजेरी त्यांच्या मनात शंका उत्पन्न करत आहे. (कदाचित ऑनलाइन व्यवहार करत असतील ?
)
डोळ्यात अश्रू असणारे अनेक जण या रांगांमध्ये
आपणास दिसतील. काहींचे नातेवाईक आजारी आहेत, काहींची लग्नाची गडबड आहे, काहींची
शेतीची काम आहेत, काहींचा रोजंदारीचा प्रश्न आहे, काहींचा पैसा सहकारी बँकात आहे,
कांहींना आगाऊ पगार ५०० आणि १००० च्या नोटांमध्ये दिलेला आहे. काहींना फी भरायची
आहे, काहींची लहान मुल घरात दिवसभर एकटी आहेत, कोणाला सांधेदुखी आहे, कोणाच ऑपरेशन
झालेलं आहे, तर कोणाच व्हायचं आहे, अस बरच काही आजूबाजूला चालू आहे.
रांगांची गती हा तर वेगळाच प्रश्न आहे. कारण काही ठिकाणी दिवसाला फक्त ३०
ते ४० जणांना नोटा बदलून मिळत आहेत. पुन्हा अर्थ सचिवांनी घेतलेल्या पत्रकार
परिषदेचे तपशील लोकांना माहीतच नाहीत. बँकांना माहिती पत्रकांचा पुरवठा करण्यात
यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. बँकांची वेळ सुध्दा उपलब्ध रक्कमेनुसार बदलत आहे.
कारण रोकडच संपली तर बँक कर्मचारी तरी काय करणार. पण रांगेत राहून वैतागलेल्या
लोकांची चिडचिड होते आता ते तरी काय करणार. आता निवडणूक आयोगाने निवडणुका असतील
तेव्हा बँकांनी शाई वापरू नका असे आदेश दिले. कारण उद्या बंगालमध्ये होणाऱ्या
निवडणुका. सगळा सावळा गोंधळ.
तुम्हाला वाटेल की हा लेख कुठल्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहे.
चूक. हा लेख हाडामांसाच्या जिवंत माणसांना नोटाबंदीच्या निर्णय नंतरच्या होणाऱ्या
मनस्तापाचे प्रतिनिधित्व करत आहे. आणि कुठल्याही राजकीय पक्षाच्या लेबलपेक्षा
सर्वसामान्यांच्या भावना अधिक महत्वाच्या. कारण माणसात माणूसपण शोधण्याऐवजी आपण
त्याची किंमत शोधतो. कशात ? पैश्यात...... गेल्या आठ दिवसात देशात उदभवलेल्या
अभूतपूर्व परिस्थितीचे वर्णन करणारी विंदा करंदीकर यांची “सब घोडे बारा टक्के” ही
कविता नक्की वाचा. बहुतेक प्रश्नांची उत्तर नक्की मिळतील. परफेक्ट कविता.
( तळटीप : कालच टीव्हीएफ ट्रिप्लिंग वेब सिरीज
बघितली. मस्ट वॉच. आणि लेखासाठी शीर्षक सुचल.)
काका सोंनार
गणेश चित्र शाळा
……………जनभल्यार्थ प्रकाशित
© All
Rights Reserved.
Comments
Post a Comment