प्रश्न ? एक नकोशी गोष्ट........ बरोबर ना....
तुम्हाला पडतात का प्रश्न ? प्रश्न पडायला वयाची मर्यादा आहे का ? प्रश्न पडायला
मुलगा आहे की मुलगी आहे असा भेद कारणे आवश्यक आहे का ? प्रश्न उपस्थित करणे चूक
आहे का ? की प्रश्न पडणे आता बंद झालाय का ? का आताच प्रश्नच का ? कशाला पडायला
हवेत प्रश्न ? त्याची काय गरज ?
प्रश्न कसे पडतील ? प्रश्न कसे पडावेत
? प्रश्न कशाबद्दल पडावेत ? त्याचा फायदा काय ? असे आणि बरेच प्रश्न आपणास पडतात
का ? कारण आता आपणास प्रश्न पडत नाही आणि कोणाला उत्तरे द्यायला आवडत नाही. कारण
जी गोष्ट मला आवडतच नाही त्याच्या परिणामाची पर्वा आपण का करावी. प्रश्न आला
म्हणजे उत्तर आलेच. आपल्या आजूबाजूला अनेक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सी.ए., शिक्षक,
प्राध्यापक अशा अनेकांची गर्दी असेलच. आणि तुमची त्यांच्याशी तुलना देखील केली
गेली असेलच. तुलना केली जाणारच कारण आपण एका व्यवस्थेचे गुलाम ठरलो आहोत.
ब्रिटिशांनी आपल्या कारकूनगिरीची गरज भागवण्यासाठी केलेल्या व्यवस्थेचे. अशीच एक
व्यवस्था म्हणजे आजची शिक्षण व्यवस्था. आणि या शिक्षण व्यवस्थेवर ब्रिटीशांचा
प्रभाव नाही अस म्हणणे म्हणजे आपण स्वतःची फसवणूक केल्यासारखी आहे.
आपल्या देशाच्या आजच्या आणि
भविष्याच्या गरजांचा विचार न करता साचेबद्ध, ठोकळेबाज, रटाळ शिक्षण शिकत असल्यामुळे
आपण असे वागत आहोत. ब्रिटिशांना व्यवस्थापन करण्याचा दांडगा अनुभव होता त्यामुळे
त्यांनी अशा काही व्यवस्था निर्माण केल्या की आजही आपणास नवीन व्यवस्था
स्वीकारण्यास खूप कठीण जात आहे. बदल होत आहे पण त्याचा वेग अतिशय मंद आहे. आजची
पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्थेची रचना, महसूल यंत्रणा (शेतसारा वगळून), विद्यापीठांची
रचना इतकेच काय तर आपली राजकीय व्यवस्थेवर सुध्दा ब्रिटीश राज्यव्यवस्थेचा परिणाम
अजूनही दिसत आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की याचा आणि प्रश्न पडायचा काय
संबंध आहे. संबंध आहे.
त्यासाठी आपणास ब्रिटीशांच्या कारकून
व्यवस्थेचा एक मुलभूत परिणाम लक्षात घेतला पाहिजे. ब्रिटीश यंत्रणामध्ये काम
करणारे भारतीय फक्त काम करायचे, त्यांना हे काम का करायचे आहे ? असे विचारण्याचा
अधिकार नव्हता. त्याचे परिणाम माहीत नसूनदेखील ते काम ते करत होते कारण त्यांना
त्या बदल्यात महिन्याकाठी निश्चित वेतन मिळत होत. आणि शोषित समाजाकडून सन्मानदेखील
मिळत होता. कारण ते साहेबांच्या सेवेत होते. पण आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की
भारतात एकोणिसाव्या शतकात घडून आलेल्या सामाजिक परिवर्तनात पाश्चात्य शिक्षणाचा
मोठा वाटा होता. आपल्या देशाचे नेतृत्व करणारे बहुतांश राजकीय आणि सामाजिक
नेत्यांनी पाश्चात्य शिक्षण घेतले होते अथवा त्यांच्यावर पाश्चात्य शिक्षणाचा,
मुल्यांचा प्रभाव पडला होता. परंपरागत शिक्षण घेणाऱ्या एकोणिसाव्या शतकातील भारतीय
समाजाच्या एका ठराविक वर्गाने पाश्चात्य शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आणि आज त्याचे परिणाम
म्हणजे स्त्रियांना मिळणारे बरोबरीचे स्थान, अस्पृश्य आणि दलित समाजाबद्दल बदललेला
आपला दृष्टीकोन, आधुनिक मुल्यांचा स्वीकार आणि सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने केलेली प्रगती. आता गंमत बघा भारतातील
पाश्चात्य शिक्षणाच्या सुरवातीच्या काळात विज्ञान आणि तत्त्वज्ञान हे मुख्य विषय
होते.
म्हणजे आजपासून बरोबर दोनशे वर्ष आधी
कुठ्ल्यातरी भारतीयाला प्रश्न पडला असणार की काय करू ? कोणता पर्याय निवडू ?
परंपरागत की पाश्चात्य. आणि तिथूनच सुरवात झाली असणार. १८०० ते १८५० दरम्यान
महाराष्ट्रात वर्तमानपत्र आणि विविध विषयांवरची त्रैमासिक, मासिक आणि साप्ताहिक
सुरु करावीत का ? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. त्यातील काहीजणांनी प्रत्यक्षात
ती सुरुदेखील केली. उदा. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतले दर्पण नावाचे पहिले
वर्तमानपत्र सुरु केले. पण याआधीच्या इतिहासात आपणास इतक्या मोठ्या प्रमाणात
शिक्षणविषयक चर्चा दिसून येत नाही. कारण छपाई यंत्राचा शोध. शाईमध्ये प्राण्याची
चरबी वापरली जाते या शंकेने अनेकांनी पर्यायी व्यवस्था देखील केली. आता यामध्ये एका
गोष्टीचे साम्य आपणास दिसून येईल की काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी. त्यासाठीचे
निरनिराळे पर्याय. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काहीजणांना पडलेले प्रश्न. सामाजिक
म्हणा, राजकीय म्हणा की तत्त्वज्ञानविषयक म्हणा.
महाराष्ट्राला महान अशी संतपरम्परा लाभली
आहे. आणि त्यामध्ये देखील एक समान दुवा आहे तो म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेमध्ये परिवर्तन
घडवून आणणे. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम अशी अनेक उदाहरणे आपणास घेता
येतील. भजन, कीर्तन आणि नामस्मरण याच्या मदतीने तत्कालीन समाजाचे प्रबोधन केले आणि
समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणले. आता यामध्ये देखील काही प्रश्न आणि त्यांची
उत्तरे याचा एक मोठा वाटा आहे. कारण प्रस्थपित रूढी आणि परंपरा यामधले दोष त्यांना
प्रबोधन करण्यासाठी प्रेरणा देत होते. काहीतरी बदल घडायला हवा असेल तर प्रस्थापित
व्यवस्थेतील दोष आपण दुरुस्त केले पाहिजे किंवा इतरांना त्याची जाणीव करून देणे
आपले कर्तव्य आहे.
कारण प्रत्येक गोष्ट, वस्तू काही काळानंतर
कालबाह्य ठरत असते पण एक गोष्ट मात्र चिरंतर राहते ती म्हणजे प्रेरणा. काहीतरी
करण्याची. काहीतरी बदलण्याची. आणि यामध्ये वर्षानुवर्षे एकाच गोष्टीचे कर्मकांड
होता कामा नये यांची काळजी घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे. कारण एखाद्या गोष्टीचे
कर्मकांड झाले की त्यामध्ये बदल म्हणजे पाप ठरवले जाते आणि त्यास स्थितिशीलता
प्राप्त होते. आणि स्थितिशीलता हे भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. ही स्थितिशीलता
दूर करण्यासाठी शिक्षण हा एकच पर्याय आहे. आणि यामध्ये शिक्षकांचा वाटा महत्वपूर्ण ठरणार
आहे. जगाला चांगले विद्यार्थी होऊ इच्छिणारे शिक्षक हवे आहेत. मी जग ही संज्ञा
मुद्दामच वापरली आहे. कारण येत्या काळात जगाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न आपण
बघत आहोत. आणि भारताला असलेली प्राचीन संस्कुती आणि आधुनिक मुल्यांचा आपण केलेला
स्वीकार याचा सुंदर मिलाफ करण्याची ताकद आपणामध्ये आहे.
आपण जे शिकतो त्यामध्ये आपणास गंमत
वाटली पाहिजे कारण शिक्षण हे फक्त पुस्तकांमध्ये असा काहीसा गैरसमज आपणा सर्वांना
झाला आहे. आपण जर स्वतःला, आपल्या जवळच्या व्यक्तींना फक्त काही प्रश्न विचारा. पहिला
म्हणजे याआधी शेवटी कधी तुम्ही रात्री आकाशात बघून नक्षत्र ओळखायचा खेळ खेळला आहात
? आठवायचा प्रयत्न करा. याआधी तुम्ही कधी समुद्राची भरती किंवा ओहोटी पाहायला
म्हणून एका जागी स्थिर बसला आहात काय ? आपण मिठाला रसायनशास्त्रात NaCl म्हणतो
पण आपण कधी घरच्या मिठाच्या बरणीला NaCl नावाचे लेबल लावले आहे काय ? सूर्याचे भासमान
भ्रमण म्हणजे काय हे तुम्हाला माहीत का ? आणि त्याचा संबंध आपल्या घरात पडणाऱ्या ऊन-सावलीच्या
खेळाशी आहे. कारण आपण दररोज अनेक गोष्टी पाहतो पण त्या गोष्टी पाहून आपणास प्रश्न
पडत नाही. किंवा आपण शाळेत जात असताना अनेक नवीन संकल्पना, माहिती आपणास माहीत होत
असतात. पण आपण त्या एक परीक्षेतला प्रश्न म्हणूनच पाहत असतो आणि अशीच शिकवण आपणास
दिली जाते.
एखाद्या गोष्टी बद्दलचा कार्यकारणभाव समजून
घेणे आपण विसरून गेलो आहोत. ही बाब फक्त अभ्यासातच लागू होते असे तुम्हाला वाटत
असेल तर तुम्ही चुकताय. एखादी कला शिकत असताना आपणास नवी आव्हाने, नवी शैली, नवी
माध्यमे हवीहवीशी वाटू लागली तरच कला बहरू लागते. खेळात सुध्दा तेच. नवी आव्हाने,
नवे डावपेच करणारा खेळाडूच यशस्वी ठरत असतो. म्हणजे खेळाडू असो की कलाकार नवी
आव्हाने त्याचा विकास करत असतात. नवी आव्हाने, नवी शैली, नवे डावपेच हे नवे प्रश्न
निर्माण करतात. आणि त्यामुळेच कलेचा विकास होत जातो. अथवा खेळात प्राविण्य मिळवता
येते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असो, तुम्ही त्या कामाचे मूल्य
पगारापेक्षा नाविन्यात शोधलात तर तुम्हाला कामाची मजा येईल. नाविन्याचा शोध आपणास
अस्वस्थ करतो आहे का?
भारताचा विचार केला असता कारकुनी शिक्षण
ही एका विशिष्ट काळाची गरज होती. पण गांधीजीनी सांगितलेली वर्धा शिक्षण पद्धती
किंवा रवींद्रनाथ टागोर यांची शांती निकेतन या सारख्या प्रयोगशील शाळांची आपण
मोठ्या प्रमाणावर स्थापना केली पाहिजे. कारण आपल्याकडे सो कॉलड इंटरनॅशनल स्कूल पेक्षा अशा प्रयोगशील शाळाची जास्त गरज आहे. कारण पाश्चात्य शिक्षणाबरोबर
आपण कला, क्रीडा, साहित्य, कौशल्य आधारित शिक्षणाचा योग्य मिलाफ केला पाहिजे.
ज्यावेळी भारतीय शिक्षण ‘काय ?’ या
प्रश्नापेक्षा ‘का ?’ आणि ‘कसे ?’ या प्रश्नांना अधिक महत्त्व देईल तेव्हाच बदल
घडून येईल.
काय ?
लिहिले ते समोर आहेच.
का ?
काहीतरी बदलायचे.
कसे ?
ते तुम्ही ठरवा.
का ?
........................................................................
काका सोनार गणेश चित्र शाळा
© All Rights Reserved.
Comments
Post a Comment