आळस, कंटाळा .........सर्वांनाच
येतो. तुम्हाला येतो का ? येत असणारच. तुम्हाला कोणत्या गोष्टीचा कंटाळा येतो ? तुम्ही
आळशी आहात का ? किंवा तुम्ही एखाद्या कामाचा आळस करता का ? असे बरेच प्रश्न
तुम्हाला पडत असतील किंवा कोणाला तरी विचारावे असे वाटत असेल. आळस, कंटाळा काहीही
म्हणा प्रत्येकाला येत असतोच. पण तो कधी येतो ? किती येतो ? आणि का येतो ? याचा
तुम्ही कधी विचार केला आहे का ? आणि तो येऊ नये यासाठी तुम्ही काय करता ? आणि या
बद्दल सल्ले, सुचना आणि उपदेश असे बरेच काही तुम्ही ऐकत असाल.
एक अशी गोष्ट तिला आपण नेहमीच बाजूला
ठेवतो. एक अशी गोष्ट जी आपल्या खूप जवळ असते पण तरीही ती आपणास उमगत नाही. किंवा
त्याची जाणीव होत नाही. अशी ही कोणती गोष्ट आहे ? लक्षात येतंय का ? होय अगदी
बरोबर. आपली आवड. आपल्या आवडीचे काम जर आपणास करायला मिळाले तर आपण ते काम आपण न
कंटाळता करू शकतो. ते काम कोणतेही असू शकते. त्यासाठी कशाचेही बंधन बाळगण्याचे
कारण नाही. कारण आपण अनेकदा स्वतः भोवती एक चौकट निर्माण करतो आणि त्या चौकटीलाच
आपलं विश्व समजतो. प्रत्येक जण जन्मताच कलाकार असतो पण आयुष्याच्या एका विशिष्ट
टप्प्यावर आपणास अस वाटू लागत की आपल्याजवळ एखादी कला असती तर माझा वेळ तरी गेला
असता किंवा मी व्यक्त झालो असतो.
मग आता आपणास असा प्रश्न पडला असेल की
मग हा कलाकार गेला कुठे ? आणि जर तो जन्मताच माझ्यात होता तर मग मी त्याला शोधू
कुठे ? किंवा माझ्यात नक्की कुठली कला आहे ? पण तत्पूर्वी आपण हा कलाकार नक्की
कशामुळे दूर जातो याचा विचार केला पाहिजे. बालवयात आपण सर्वात वेगाने शिकत असतो. निरनिराळे
शब्द, निरनिराळ्या हालचाली आपण शिकत असतो. आपणास त्यावेळी त्या गोष्टीचे कुतूहल
वाटत असते म्हणून आपण ती गोष्ट करत असतो, त्याचे अनुकरण करत असतो. लहान मुलांमधील
एक गोष्ट आपणास नक्कीच लक्षात आली असेल तो म्हणजे त्याचे अवधान. लहान मुलांना एखादे
खेळणे कितीही आवडत असले तरी त्याहून वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण खेळणे जर दुसऱ्याकडे
असेल तर ते देखील त्याला हवे असते. पण त्या खेळण्यामध्ये ते बालक जास्त वेळ रमत
नाही. असे का घडते ? कारण लहान मुलांना नवीन गोष्टीचे नेहमीच आकर्षण असते. पण काही
वेळामध्ये त्याचे अवधान दुसरी कोणती तरी गोष्ट खेचून घेते. आणि यामुळेच लहान मुले
खूप नवीन गोष्टी शिकत असतात.
आता आपण काय करतो ते पाहुया. आधी
सांगितल्याप्रमाणे आपण स्वतःभोवती एक चौकट निर्माण करतो. आपण स्वतःच्या जगण्याची एक
शैली तयार करतो आणि यासाठी आपण काही विशेष मेहनतही घेत नाही. आपण इतके वर्ष करत
असलेल्या दिनक्रमातून ही शैली तयार होत असते. आपल्या जगण्याच्या शैलीची आपणास इतकी
सवय होते की यामध्ये बदल झाला की आपण अस्वस्थ होतो. म्हणजे याचा अर्थ काय ? आपल्या
जीवनात जर एखादी घटना नव्याने घडली तर त्या नुसार जुळवून घेणे आपणास जड जाते. लहान
मुलांच्या बाबतीत देखील असेच घडते पण त्या मध्ये थोडा फरक आहे. लहान मुले मुक्तपणे
आपल्या भावना व्यक्त करतात, रडतात, चिडतात. किंवा काही वेळाने त्याची तीव्रता कमी
होत जाते. आपल्या बाबतीत देखील तसेच घडते. आपण त्याचा वेग खूप कमी असते. आपण
अनावश्यक गोष्टी उगाचच कुरवाळत असतो. यामध्ये कुतूहल ही गोष्ट अनेक प्रकाशवर्ष दूर
असल्यासारखी वाटू लागते. आपण यामध्ये आपला भरपूर वेळ चिंता, स्वप्नरंजन, शक्यता इ.
खर्च करतो. आणि यामुळे आपण आपल्या रिकाम्या वेळचा उत्पादक कामात उपयोग करत नाही.
उत्पादक काम म्हणजे काय ? उप्तादक कामे म्हणजे अगदी
काहीही असू शकतात. चित्र काढणे, कविता लिहिणे, बागकाम करणे, घरात सजावटीच्या वस्तू
स्वतः तयार करणे. पुस्तके वाचणे, नवीन पदार्थ तयार करणे. आपण वयाच्या विशीनंतर
केव्हा ओरिगामी कलेचा वापर आपला रिकामा वेळ घालवण्यासाठी केला आहे का ? सहजच
एखाद्या कागदाची होडी करावी आणि पावसाच्या पाण्यात सोडावी अस आपणास वाटत ; पण ते आपण
करतो का ? आपण याआधी कधी वर्तमानपत्रातील आपल्या
आवडीच्या विषयावरची कात्रण कापून जुन्या वहीत चिकटवली आहेत ते तुम्हाला आठवत का ? जुन्या
पुस्तकांची कव्हर तुम्हाला उलगडावी आणि त्या मागची चित्र पुन्हा पहावी अस कधी
वाटलाय का ? किंवा जुन्या वहीच्या पानांवरून हात फिरवावा अस तुम्हाला या आधी कधी
वाटलं होत ? अस बरच काही आपण लहानपणी अगदी आवडीने करायचो पण आता काय ? आपण मोठे
झालो. शिंग फुटली वाटतंय. उत्तर एकच. आपल्यातला कलाकार आपण त्या चौकटीत खूप खोलवर दडपून
ठेवला आहे. कलाकार म्हणजे काय याच्या आपल्या काहीही व्याख्या असोत पण सर्वात सोपी
व्याख्या म्हणजे जे आपल्या मनात आहे ते प्रत्यक्षात उतरवणारे लहान मुल म्हणजे
कलाकार. अस लहान मुल जे स्वच्छंदी आहे. जे परिणामांची पर्वा न करता प्रत्येक क्षण
जगते.
पण आपण काय करतो. मनातील खूप आंदोलनानंतर
आपण नेहमीच नकारात्मक विचार करतो. कारण आपणास वाटणारी भीती. ती कशाबद्दल आहे याचे
कोडे आपणास उलगडत नाही. उदा. आपण कधी खूप निराश झाला असाल तर कसे व्यक्त होता ?
किंवा कधीतरी उगाचच आपणास एखाद चित्र काढावं, कविता करावीशी वाटते, पण ते चित्र
आपण कधी काढतच नाही किंवा ती कविता मनातच सुचते आणि मनातच विरून जाते. आपणास एखादी
वस्तू अथवा व्यक्ती आवडली असता आपण समाजातील आपल्या प्रतिमेला कुरवाळत बसतो आणि तो
क्षण आपल्या हातातून निसटून जातो आणि असे बरेच क्षण. आपणास खूप काही हवं असत किंवा
आपल्यासमोर खूप काही असत पण ते आपण क्षणोक्षणी गमावत बसतो. अस वेळोवेळी घडायला
लागल की आपण निरुत्साही होतो. काही वेळाने अशा गोष्टींचा कंटाळा येऊ लागतो. अशाच
गोष्टी इतर करत असतील तर आपणास कधी कधी त्यांचा राग येतो कारण ती गोष्ट आपणास आवडत
असूनही आपण करत नसतो. ईर्ष्या म्हणा हवं तर. कधीतरी करून बघाव अस देखील वाटत पण ती
चौकट. जर आपणास एखाद्या गोष्टीबद्दल निरुत्साह असेल, त्याचा कंटाळा यात असेल तर
त्याबरोबर आळस सुध्दा आलाच.
आळस ही एक गोष्ट आहे जी आपणास निष्क्रिय
करते. कंटाळा हा काही काळासाठी येऊ शकतो. किंवा निरुत्साहाला योग्य वातावरणाची
फोडणी मिळाली तर त्याचे उत्साहात रुपांतर होऊ शकते पण आळसाचे काय ? क्षमता
असूनदेखील जर आपण आळशीपणाला जवळ केले तर आपले आयुष्य निरस बनते. साध्या गोष्टीतील
आनंद आपण गमावून बसतो. आणि आनंदाचे मोजमाप करू लागतो. खूप आनंद हा गोष्टीतील भिकाऱ्याच्या
फाटक्या झोळीसारखा होऊन बसतो. समाधानाची व्याख्या आपण बदलून टाकतो. सहवासातील छोटे
क्षण जे आपणास संकटकाळी धीर देत असतात ते आपण गमावून बसतो. काय कमावले आणि काय गमावले
याचा हिशोब आपण घालत बसतो. आणि एका क्षणी आपणास हा आळस झटकून द्यायला हवा अशी
जाणीव होते पण त्या वेळी खूप उशीर झाला असा आपण स्वतःचा समज करून घेतो आणि पुन्हा
त्याच चक्रव्युहात पुन्हा अडकून बसतो. नेहमी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती
म्हणजे कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरवात करायला ज्या क्षणी असा विचार आपल्या
मनात येतो, तोच क्षण हा योग्य असतो.
तेव्हा.......
तुमच्यातल्या लहानग्याला,
म्हणजेच कलाकाराला,
जागवण्याची,
हीच ती वेळ आहे,
चला....नवीन सुरवात
करूया.
काका सोंनार गणेश चित्र शाळा
© All Rights
Reserved.
Comments
Post a Comment