शोध. घेत आहे. घेत राहणार. घेईन. घ्यालला
हवा. घेणार आहे. घेणार कोण ? कशाला घ्यायचा ? प्रत्येकजण कशाचा तरी शोध घेतच असतो.
प्रत्येकजण काहीतरी शोधतच असतो. तसा शोध हा शब्द आपल्यापासून कोसो दूर आहे अस
वाटणारे अनेकजण आपल्या आजूबाजूला असतील. शोध म्हणजे काय रे भाऊ....? अस म्हणणारे
देखील अनेक जण आपल्या आजूबाजूला असतील.
शोध या शब्दाशी आपली ओळख शाळेतच झाली
असेल. त्याआधी आपण लपाछपीचा खेळ खेळून आपण शोध घेताच होतो. विजेच्या दिव्याचा शोध
कोणी लावला ? वाफेचे इंजिन कोणी शोधून काढले ? टेलीफोनचा शोध कोणी लावला ? अमेरिका
खंडाचा शोध कोणी लावला ? गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला ? अग्नीचा शोध, चाकाचा
शोध अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्ही शाळेत दिली असतीलच. मुद्दामच या प्रश्नांची
यादी दिली आहे कारण तुम्हाला भूतकाळाची आठवण व्हावी हेच प्रयोजन.
शोध आपली पाठ काही सोडत नाही. अगदी
अकरावीच्या प्रवेशासाठी चांगल्या कॉलेजचा शोध. पुन्हा चागंल्या कॉलेजची व्याख्या
काय हे आपल्या सोयीनुसारच ठरवलं जात. क्लासला सवलत मिळाली तर बर होईल. नीट, सीईटी
चा अभ्यास करायचाय ना. चांगली प्लेसमेंट मिळेल अशा कॉलेजचा शोध. नोकरीचा शोध. चांगल्या
पॅकेजसाठी
नव्या कंपनीचा शोध. नंतर
लग्नासाठी वर-वधूचा शोध. लग्नासाठी हॉलचा शोध. लग्नातल्या खाण्याच्या चवदार मेनूचा
शोध. चांगल्या घराचा शोध. अशा बऱ्याच गोष्टीचा शोध आपण घेत असतो. आणि घेत राहणार.
एवढे सगळ शोधून आपण दमला असाल. पण आता
बदलत्या काळानुसार शोध देखील बदलले. चांगला मोबाईल, चांगले हेडफोन. चांगली होम थिएटर
सिस्टीम. चांगली फोर व्हीलर. चांगली टू व्हीलर, चांगला लॅपटॉप. चांगला नेट स्पीड. आणि बरच
काही. पण यामध्ये आपण एका गोष्टीचे निरीक्षण केले आहे काय ? मला वाटत तुमच्या
लक्षात आल असेल. तो म्हणजे आनंदाचा शोध. पण हे असच आहे का ? जी व्यक्ति नेहमी
चांगल्याचा शोध घेते ती व्यक्तिसुध्दा आनंदी असेल काय ? याचा काय संबंध ? संबंध
आहे अस मला वाटत. आणि या सर्वांमध्ये एक समान दुवा आहे. तो म्हणजे आपल्यापैकी
बहुतेक सर्वांना भौतिक गोष्टीतील आदर्श हवेहवेसे वाटतात.
आपण एखाद्याच्या आनंदाची किंमत भौतिक
गोष्टींच्या मालकीवर करतो. एखाद्याची भौतिक गोष्टींवरील मालकी आपणास त्याचा आनंद
वाटू लागतो. आणि त्याचा आनंद माझ्या आनंदापेक्षा कसा जास्त आहे अस वाटू लागत. पण
भूक लागल्यावर साधे पोहे खाल्ले तरी आपले पोट भरते. तहान लागल्यावर आपणास घोटभर
पाणी अमृतासारखे वाटू लागते. भूक लागल्यावर पोहे बघून झाला तो आनंद आणि खाल्ल्यावर
मिळाले ते समाधान. तसेच तहान लागल्यावर पाणी बघून झाला तो आनंद आणि प्यायल्यावर
झाली ती तृप्ती. पण आपण अस करतो का ? जर आणि तरच्या विश्वात रमून आपण तो आनंदाचा क्षण
गमावून बसतो.
भौतिक गोष्टी ज्याचा उल्लेख तर मी वरच्या
परिच्छेदांमध्ये केलाच आहे. भौतिक गोष्टी हव्याहव्याश्या वाटण्यात गैर काय ? हे
म्हणजे साम्यवादी आणि भांडवलशाही यामधल्या वादासारख झाल. पण ते अस नाही आहे. आपण
भौतिक गोष्टी पूर्णपणे नाकाराव्या असच कोणीच म्हणत नाही पण भौतिक गोष्टींबरोबर आपण
आजूबाजूला असलेल्या लहान गोष्टीतून मिळणाऱ्या आनंदाचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे ?
थांबा. एक छोटीसी गोष्ट. दोन मित्रांची. आपल्यासारखेच. एका तळ्याकाठी फिरायला
गेलेले. तळसुध्दा सुंदर, शांत, निवांत. काहीही म्हणा. पण हे तळ जरा जास्तच सुंदर
होत. कारण त्या तळ्यातली कमालीची कमळाची फूल. एक मित्र म्हणजे सेल्फी बहाद्दूर.
कमळाबरोबर कसा सेल्फी येईल याचा अंदाज घेत बसलेला. पाण्यात उतरून सेल्फी काढला तर मजा
येईल ना. अस काही म्हणत होता. पण चिखलाच काय ? मोबाईल पाण्यात तर पडणार नाही ना ?
असे अनेक प्रश्न त्याच्या मनात होते. तरीही धीर करून तो पाण्यात उतरला. चप्पल
घालूनच. पायाला काय लागलं तर अशी चिंता करत. तोल सावरत. दुसऱ्या मित्राची मदत घेत
ढोपरभर पाण्यात उभा राहून आपले कर्तव्य पार पाडत होता.
पुन्हा सोबतचा मित्र म्हणजे एक अजब रसायन
होता. आपल्या मित्राची मदत करून तो एका खडकावर बसला. ढोपरावर कोपर आणि तळहातावर
हनुवटी ठेऊन. थोडा कवी मनाचा म्हणा हवं तर. तसाच असावा. कारण खिशात मोबाईल असून
देखील स्तब्ध असलेला. तरीही काहीतरी शोधत असलेला. तंद्रीतच होता. समोर सुंदर
निसर्ग असूनदेखील स्तब्ध. विचित्र आहे..... वाटत. पण कमळाच्या फुलांचा तो ताटवा
त्याला स्तब्ध करत होता. तो म्हणे ते दृश्य आपल्या डोळ्यात साठवत होता. तो क्षण
जगत होता. मित्राच्या हाकासुध्दा त्याला ऐकू येत नव्हत्या. पक्षी समोरून उडत होते.
भुंगे कमळावर खेळ खेळत होते. त्यांचा आवाज. एखादा बेडूक आपला तोल सावरत कमळाच्या
पानांवर चढायचा प्रयत्न करत होता. मध्येच एखादा लहान दगड पाण्यात टाकावा आणि तरंग
पाहत तासनतास बसाव अस काही त्याला वाटत होत. खंड्या पक्षी मध्येच पाण्यात सूर मारून
मासे पकडत होता. बगळ्यांची सभा जणू तळ्यापलीकडच्या झाडावर भरली आहे अस त्याला वाटत
होते. आणि उगाचच काय बर विषय असेल यांच्या सभेचा. झाडाचा मेंटेनन्स डिजिटल पेमेंटमध्ये
द्यावा. हा तर विषय नसेल ना. असे विचित्रविचार सुध्दा. थोडक्यात काय. तो आजचा क्षण
उद्याच्या आठवणींसाठी जगत होता.
पहिल्या मित्राचा सेल्फीचा खटाटोप चालूच
होता. त्याला हवा तसा सेल्फी काही येत नव्हता. चांगल्या सेल्फिसाठी तो जरा जास्तच
पुढे गेला. घाबरू नका बुडाला वैगेरे नाही. पण कमळाच्या वेलीमध्ये त्याचा गुंता
झाला. त्यामुळे त्याचा हिरमोड झाला होता. कारण वेलीचा गुंता सोडवण्याच्या गडबडीत
त्याला मोबाईल खिशात ठेऊन हात पाण्यात बुडवावे लागले. त्याला पाण्याखाली हात
बुडवताच विचित्र जाणीव झाली. कारण पाण्याखालील पानवनस्पती आणि शेवाळ. काहीसा
वैतागतच मित्राच्या मदतीने तो कसाबसा पाण्याबाहेर आला. त्याने सुटकेचा निश्वास टाकला
आणि म्हणाला,
सुटलो
बाबा एकदाचा.
पण पहिला
मित्र आपल्या दुसऱ्या मित्रावर रागावून म्हणाला, “ऐकू येत नाही काय ?” किती हाका
मारल्या.
दुसरा
मित्र : अरे मी तर आलो तुझ्या मदतीला.
पहिला
मित्र : अरे पण, पहिल्या हाकेला आला नाहीस ना.
काय, करत काय होतास ?
( क्रमश
) ..............................................
असा काहीसा वाद घालत त्यांचा तळ्यावरचा
एपिसोड संपला. पण जो मित्र सेल्फी काढत होता तो आपल्या सोबत कटू आठवणी सोबत घेऊन
गेला. ( ........... ) यापुढे कधीही त्या ठिकाणी न जाण्याच्या निश्चयाने.
निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी त्याचा आनंद एका काही एमबीच्या फोटोत अडकून राहिला.
काही फुटकळ लाईक्ससाठी. एखादा फोटो काढला तर मान्य आहे पण फक्त ट्रेंड बदलला
म्हणून आनंदाची व्याख्या बदलावी हे म्हणजे खूपच वरवरचे ठरते. आनंद त्याच्या
अवतीभोवती असूनदेखील तो त्याला शोधू शकला नाही. आनंद आपण जगत असलेल्या क्षणात
शोधायचा सोडून तो शक्यता आणि अंदाज व्यक्त करत आज शोधत होता.
दुसरा मित्र म्हणजे. त्या क्षणाचा पुरेपूर
आनंद घेत होता. प्रत्येक क्षण जगत होता. तळ्याकाठचा निसर्ग, तिथले निरनिराळे आवाज,
पक्षी, बेडूक आणि फुलांचे रंग असं बरच काही त्याचा पोतडीत जमा झाल होत. आणि गंमत
बघा दुसऱ्या मित्राने सुध्दा फोटो काढला. फक्त एकच. कुठला असेल ओळखला का ? नाही........
सेल्फी नाही. तर आपल्या मित्राचा. वेलीचा गुंता सोडवत असताना, शर्टच्या खिशातून
मोबाईल पडू नये यांची धडपड करतानाचा. आणि कहर म्हणजे त्याचे दोन्ही हात पाण्यात असतानाचा.
आता क्रमश संवाद पुन्हा चालू करूया.
दुसरा
मित्र : तुझा फोटो काढत होतो.
पहिला
मित्र : दाखव. कसा आला बघू.
( फोटो पाहताच पहिला मित्र खदखदून हसू
लागला. आणि म्हणाला.)
जबर. पण कोणाला दाखवू नको हा.
सिक्रेट आपल्यातले.
तेव्हा,
आनंद.
शोधा प्रत्येक क्षणात.
साठवा मनात.
आठवा मनात.
जितका मिळाला.
तितका द्या.
आनंद.
काका सोनार गणेश चित्र शाळा
© All Rights Reserved.
Comments
Post a Comment