आपण दैनंदिन जीवनात अनेक अनुभव घेत
असतो. काही अनुभव दृश्य असतात म्हणजेच दिसणारे. काही अनुभव श्राव्य असतात म्हणजेच
ऐकू येणारे. तर काही दृक-श्राव्य असतात म्हणजेच दिसणारे तसेच ऐकू येणारे. या
सर्वामध्ये दृक-श्राव्य अनुभव हा दीर्घकाळ टिकतो. कारण आपण अशा अनुभवांमध्ये दृश्य
आणि ध्वनी यामध्ये सहसंबंध जोडू शकतो. ह्या अनुभवांचा आपल्यावर खोलवर परिणाम होतो.
असे परिणाम अतिशय प्रभावीपणे देण्याचे माध्यम म्हणजे दूरदर्शन. आता यामध्ये नवीन
माध्यमाची भर पडली आहे. ते माध्यम म्हणजे इंटरनेट. इंटरनेट म्हणजे माहितीचा
विस्फोट. असंख्य माहितीची खाण. अशी खाण जी आपणास दृक, श्राव्य आणि दृक-श्राव्य
अनुभव देते. पण आता आपण जे पाहतो, ऐकतो ते सत्य आहे का ? हा विचार करण्याची वेळ
आता आली आहे.
इंटरनेट हे मनोरंजनाचे एक प्रभावी
साधन आहे. इन्टरनेटमुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आपणास नवीन नवीन गोष्टी शिकता
येतात. दिवसभराच्या दगदगीनंतर थोडा निवांत वेळ आपण इंटरनेट सोबत घालवतो. या
माध्यमाचा आपल्या मतमतांतरावर परिणाम होतो. थोडक्यात काय आपल्या मनावर वेगवेगळे
संस्कार करण्याचे कार्य इंटरनेट या माध्यमामुळे होते. पण दूरदर्शन या माध्यमावर
काही बंधने आहेत. त्याला आपण सेन्सॉरशिप असेही म्हणतो. सेन्सॉरशिप असावी की नको या अनेक मतमतांतर असू
शकतात. आणि सेन्सॉरशिप नको म्हणणारे संस्कृतीचे भक्षक वैगेरे काही ठरवले जातात.
कारण छोटे विचार करणाऱ्या लोकांसाठी सेन्सॉरशिप हा शब्द अतिशय मर्यादित अर्थाचा
असतो. त्याचे विश्लेषण ते अश्लील, बीभत्स अशा काही शब्दामध्ये करतात. पण विचारांचे
काय ? जर विचार, भावना जर सेन्सॉर केले गेले तर मात्र एखाद्या विषयाची मांडणीच नीट
पद्धतीने होऊ शकत नाही.
तुम्हाला वाटत असेल की हे काय नवीन
आता ? माहीत आहे. थोडा उशीर झालाय. पण तर त्याला कारणही तसाच आहे. गेल्या आठवड्यात
दंगल चित्रपटातील लहानपणीच्या गीताची भूमिका बजावणाऱ्या झायरा वसिम हिच्या झालेली
टीका म्हणजे प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची वेळ आता आली आहे. झायरा वसिम ही फक्त
१६ वर्षाची आहे. तिच्या कडून तुम्ही कोणती अपेक्षा करत आहात. तिचे वय वेगवेगळे
अनुभव घेऊन आपले जीवन समृद्ध करण्याचे आहे. आमीर खान सारख्या सेक्युलर विचाराच्या
अभिनेत्याबरोबर काम केल्यानंतर तिला आलेला हा अनुभव अतिशय भयानक आहे. तिला टीकेचे
लक्ष्य करण्याचे कारण अतिशय संतापजनक आहे.
भारतासारख्या स्वतंत्र देशामध्ये आपण
कोणाची भेट घ्यावी किंवा घेऊ नये हा आपला वैयक्तिक निर्णय आहे. आपण ज्या व्यक्तीची
भेट घेत आहोत ती व्यक्ति समाज विघातक काम करत नसेल तर आपणास घाबरण्याचे काही कारण
नाही. हा विषय एक उदाहरण आहे. कारण असे घडण्याची ही काही पहिली वेळ नाही.
एखाद्याचे खच्चीकरण करण्याची एक नवीन पद्धत आहे, हे खच्चीकरण मानसिक, सामाजिक,
सांस्कृतिक अशा अनेक प्रकारचे असू शकते. आणि त्यासाठी एक नवीन संज्ञा वापरली जात
आहे ती म्हणजे इंटरनेट ट्रोल. इंटरनेट ट्रोल म्हणजे इंटरनेटच्या मदतीने
एखाद्याच्या विचाराचे खच्चीकरण करणे. त्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करणे. त्यासाठी
त्याच्या विरोधात इंटरनेटवर वेगवेगळ्या पद्धतीने पोस्ट करून विचारांचे दमन करणे.
त्याविषयी लोकांच्या भावना भडकवणे. या सर्वामागचा हेतू एकच असतो की सतत चर्चेत राहणे. चर्चा ही
घटनेची नसून त्यामागे दडलेल्या छुप्या अजेंड्याची असते. आणि लोकसुद्धा खुळ्या, भोळ्या
समजुतींना बळी पडून पोस्ट फॉरवर्ड करतात.
या माध्यमाचा एक घटक म्हणून आपल्या
मताची नोंद करणे हे एक परम कर्तव्य आहे. कारण या ब्लॉगवरील एखादी पोस्ट एखाद्याला
आवडली नाही म्हणून या ब्लॉगला देखील ट्रोल केल जाऊ शकत. मतभेद असण एक गोष्ट आहे
आणि संघटीतरित्या एखाद्यावर विशेष हेतूने टीका करणे म्हणजे भारतासारख्या लोकशाही
देशात कदापि सहन केले जाणार नाही. पण आपल्या देशात अजूनही माणुसकी जपणारी माणस
जिवंत आहे, आपल्या देशामध्ये किती संयम आहे हे नोटाबंदीच्या काळात आपण अनुभव घेतला
असेलच. लोकांचे मतभेद होते पण लोकांनी कधीही आपली मर्यादा ओलांडली नाही. पण जेव्हा
प्रश्न खोट्या दुराभिमानाचा येतो. तेव्हा त्या घटनेची पार्श्वभूमी लक्षात न घेता
आपण आपली मते मांडू लागतो. कारण प्रश्न अस्मितेचा आहे. मग ती अस्मिता द्वेषावर आधारित
असली तरी बेहत्तर.
आपला विचार हा इतरांच्या विचारापेक्षा
कसा श्रेष्ठ आहे. हे सिद्ध करण्याची जणू स्पर्धा चालली आहे. त्यासाठी कोणत्याही थराला
जाण्याची तयारी आपण दाखवतो. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की दुसऱ्याला कमी लेखून
आपण श्रेष्ठ होत नाही. आपला धर्म, जात, पंथ, प्रदेश किंवा भाषा याबद्दलचा अभिमान
जेव्हा दुराभिमानात परावर्तीत होतो तेव्हा आपला मार्ग चुकतो आहे हे आपण लक्षात
घेतले पाहिजे. याच एक उदाहरण
म्हणजे हिटलर. हिटलरने आपल्या वंशश्रेष्ठत्वच्या चुकीच्या मांडणीतून लाखो ज्यू
लोकांची हत्या केली. आपल्याला एखादा विचार पटला नाही तर आपण त्यासाठी एखादा त्या
तोडीचा विचार मांडला पाहिजे. असा विचार जो तुमची बाजू अतिशय समर्पक शब्दात मांडतो.
पण आपण काय करतो विचारांचा लढा विचाराने न देता आपण एखादी पोस्ट प्रथमीदर्शनी फक्त
पटली म्हणून कोणताही विचार न करता फॉरवर्ड करतो. आणि फॉरवर्ड केलेली पोस्ट हा
आपल्याच विचाराचे प्रतिनिधित्व करत आहे असे आपल्याला वाटू लागते. पण बहुतेक वेळा
अशा पोस्ट या समाज विघातक हेतूने प्रकाशित केलेल्या असतात. यामुळे हिंसेला पाठबळ
मिळते.
२०११ सालच्या अरब क्रांतीनंतर सोशल मिडिया
हे आपल्या विचारांचा प्रसार करण्याचे प्रभावी माध्यम आहे हे अनेकांच्या लक्षात
आले. पण एखाद्या गोष्टीतील सकारात्मक बाजू नेहमीच दुर्लक्षित राहते. आणि अशा माध्यमांचा
गैरवापर होऊ लागतो. कारण आपण एखाद्या गोष्टीची सत्यता न बाळगता लगेचच प्रतिक्रिया
देतो. लगेचच वातावरणाची निर्मिती करतो. त्याला काही वेळा बातम्यांची चुकीची मांडणी
करणारी प्रसारमाध्यमे खतपाणी घालतात. अशावेळी मतभेद आणि द्वेष यामधली रेषा धूसर
होते. मतभेदांचे रुपांतर द्वेषात होते. समाजविघातक गटांना पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्या
इंटरनेट वापरणाऱ्या अशिक्षित वापरकर्त्यांची गरज असते. आपण नकळत या गोष्टींना
खतपाणी घालत असतो. आपल्या अस्मिता ह्या काही फुटकळ फेसबुक पोस्ट आणि व्हिडियो
क्लिप्स ठरवत असतील तर आपला विचार किती वरवरचा आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. पण
आपण काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. आपण खिलाडूवृत्तीने वागत नसतो. आपली
चूक लक्षात आली तरी अशा वेळी माफी मागण्याची आपली तयारी नसते. ट्विटर ट्रेंडिंग
आता मॅनेज करता येतात. एवढी साधी गोष्टसुध्दा आपल्या लक्षात येत नाही. ३० ते ३५
हजार हॅश टॅग आता ठरवून करून एखादी टीम आता
कोणताही मुद्दा ट्रेंडिंगमध्ये आणू शकते.
थोडा धीर करा. स्वतःचे विचार स्वतःच्या
शब्दात मांडा. त्याचा थोडा त्रास होईल. पण तुम्हाला तुमच्या विचाराची मर्यादा
लक्षात येईल. तुमचे त्या विषयाबद्दल ज्ञान लक्षात येईल. तुम्हाला त्या घटनेबद्दल
माहिती किंवा ज्ञान मिळवण्याची गरज निर्माण होईल. आणि तुमचे विचार नेमके होतील.
विचारात स्पष्टता येईल. आणि समाज विघातक शक्तींना हेच तर नको असते.
तेव्हा शेवटी एकच,
वैसे तो,
हर चीज,
जाच के,
परख के,
लेते है हम,
क्योंकी उसकी एक किमत होती है,
क्या करे,
सोच सस्ती हो गयी !!
काका सोनार गणेश चित्र शाळा
© All
Rights Reserved.
Comments
Post a Comment